Tuesday, December 20, 2011

स्टारबस कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन पुकारले

नागपूर - स्टारबस कर्मचाऱ्यांनी मेडिकल आणि पारडी येथे बस रोखून प्रवाशांना खाली उतरवले, तसेच चालक आणि वाहकांना धमक्‍याही दिल्या. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अटकेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा जामीन घ्यावा, तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे, अशी मागणी आता आंदोलनकांनी स्टारबस व्यवस्थापनाकडे केली आहे. या गोंधळाचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सोसावा लागत आहे.

स्टारबस कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. काही वाहक, चालकांना मारहाण केली होती. यामुळे बर्डी पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना अटक केली होती. त्यांना सोडवण्यासाठी इतरांनी गोंधळ घातला होता. यामुळे सुमारे पाचशे आंदोलकांवर जमावबंदी कायद्यान्वके गुन्हे दाखल केले होते. या सर्वांना 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलकांमध्ये फूट पडली आहे. सोळाशेपैकी साडेतीनशे कर्मचारी कामावर परतले आहेत. सोमवारपासून सुमारे नव्वद बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे आंदोलक चिडले आहेत. सोमवारी मेडिकल चौक आणि पारडीजवळ स्टारबस थांववून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. चालक, वाहकांना धमक्‍या देण्यात आल्यात. यामुळे अजनी व कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना स्टारबस कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे. दोनच दिवसांपूर्वी विधानसभेत अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. असे असतानाही शहरात स्टारबस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, शहरात गोंधळ घातल्या जात आहे. मात्र शहरातील एकही लोकप्रतिनिधींनी याबाबत विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला नाही.

No comments:

Post a Comment