Thursday, January 5, 2012

प्रॉपर्टी डीलरच्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न

नागपूर -प्रॉपर्टी डीलरच्या चारवर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मोहननगरात (सदर) प्रचंड खळबळ निर्माण झाली. समोरून येणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांना हा प्रकार दिसल्यामुळे त्यांनी अपहरणकर्त्याला पकडून शेजाऱ्यांच्या मदतीने त्याची चांगलीच धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

मोहननगरातील जयनारायण चाळीत मोहम्मद रिझवान अब्दुल मन्नान (वय 40) राहतात. ते प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यांची मुलगी आयेशा (वय 4) ही चाळीतील अन्य मुलींसह घरासमोरच्या परिसरात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खेळत होती. तेवढ्यात तेथे आलेल्या एका भामट्याने आयेशाचा हात पकडून तिला आपल्यासोबत ओढत नेण्याचा प्रयत्न केला. अनोळखी व्यक्‍ती जबरदस्ती करीत असल्यामुळे चिमुकली आयेशा घाबरली आणि मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या सोबतच्या मुलींनीही आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारी धावले. बाजूच्याच चौकात असलेले रिझवानही आपल्या मित्रांसह तिकडून आले. या सर्वांनी आरोपीला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर सदर पोलिसांना बोलवून आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे मोहननगरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी आरोपीला ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केली असता तो बैतूल जिल्ह्यातील वाडेगाव (मुलताई) येथील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. महादेव रामदास पाटील (वय 50) असे आरोपीचे नाव आहे. गाव आणि परिवार सोडून आलेला पाटील गेल्या तीन वर्षांपासून नागपुरात राहतो. भंगार, बाटल्या, कचरा वेचून त्यातून आलेल्या पैशातून तो उपजीविका भागवितो. आज त्याला न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्याचा 8 जानेवारीपर्यंत पीसीआर मिळविला.

अपहरणाचा उद्देश गुलदस्त्यात
कुश अपहरण आणि हत्याकांडामुळे उपराजधानीकर प्रचंड धास्तावले आहेत. या प्रकरणाने उपराजधानीतील पालकांसोबत पोलिसही हादरले आहेत. त्यामुळे या घटनेची पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून आरोपी पाटील आयेशाचे अपहरण कोणत्या हेतूने केले ते सांगायला तयार नाही. आपण आयेशाला हातही लावला नाही, असे तो सांगतो. तेथून जात असताना आयेशाजवळ थांबलो. ती मला पाहून घाबरली आणि रडायला लागली. त्यानंतर शेजाऱ्यांनी धावत येऊन कुठलीही चौकशी न करता आपल्याला बेदम मारहाण केल्याचे आरोपीचे कथन आहे. मिळेल ते खाऊन फुटपाथवर झोपणाऱ्या या आरोपीच्या कथनामुळे पोलिसही चक्रावले आहेत. आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

No comments:

Post a Comment