Saturday, March 3, 2012

मोबाईलवर बोलणे , सिट बेल्ट न बांधणे , हेल्मेट न घालणे, सिग्नल तोडणे दोन वर्षे कैद, सोबत रोख दंड ( Dont Break Traffic Rules )


दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्या जाणार्‍या सर्वांना एकाच प्रमाणात दंड व शिक्षा न करता त्या व्यक्तिने ढोसलेल्या मद्याच्या प्रमाणानुसार त्याला जास्तीत जास्त दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोटर वाहन कायद्यातील ज्या प्रस्तावित सुधारणांना मंजुरी दिली गेली त्यात ड्रंकन ड्रायव्हिंगसाठीच्या शिक्षेत जरब बसेल अशी वरीलप्रमाणे वाढ करण्याचाही समावेश आहे. मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याप्रमाणे कायद्यात दुरुस्ती करण्यासंबंधीचे विधेयक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेश्नात राज्यसभेत मांडण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
भारतात दरवर्षी अंदाजे दीड लाख लोक रस्ते अपघातांत मरण पावतात व आणखी काही लाख अयुष्यभरासाठी अपंग होतात. दारुच्या नशेत वाहन चालविणे, मोबाईल फोनवर बोलत असताना वाहन चालविणे, सीट बेल्ट न बांधता व हेल्मेट न घालता वाहन चालविणे आणि वेग र्मयादेची बंधने न पाळता बेफाम वेगाने वाहन चालविणे ही भारतातील रस्ते अपघातांची व त्यात होणार्‍या मोठय़ा जीवितहानीची प्रमुख कारणे आहेत. 
त्यामुळे वाहतूक नियमांच्या अशा प्रकारच्या उल्लंघनांना अधिक कडक शिक्षा केल्या तर या कारणांमुळे होणार्‍या अपघातांना आळा बसू शकेल या विचाराने कायदा दुरुस्ती करून सध्याच्या शिक्षा अधिक कडक करण्याचा प्रस्ताव आहे. 
एक तर काही वाहतूक गुन्ह्यांसाठी असलेली शिक्षा व दंड वाढवून किंवा एकच गुन्हा वारंवार करणार्‍यांना नंकरच्या गुन्ह्यांसाठी चढत्या भाजणीने कडक शिक्षा करून कायद्याची जरब बसविण्याचा विचार आहे. 
मंत्रिमंडळाने आज संमत केलेल्या कायदा दुरुस्तीस संसदेनेही मंजुरी दिल्यावर त्या देशभर लागू होतील. 


मोबाईलवर बोलणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. 
पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये.
सिट बेल्ट न बांधणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. 
पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
हेल्मेट न घालणे
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
सिग्नल तोडणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
वेग र्मयादेचे उल्लंघन 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये.  

1 comment: